Thursday, 29 August 2024

दारूच्या विळख्यात हरवलेली माऊली: आत्महत्या की हत्या?

टीप : सदरील कथा ही पूर्ण काल्पनिक आहे. या कथेचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा स्थानाशी संबंध नाही . 


निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या गावातली एक घटना अजूनही लोकांच्या मनात खोलवर रुजली आहे. 

 तांबडं फुटल्यावर गावातील लोकांच्या कानात एकच बातमी गाजली—एक माऊलीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. कोणाच्या नजरेत अश्रू, कोणाच्या तोंडात शब्द नव्हते. पण चर्चा मात्र जोरात होती.

ही माऊली, एक साधी सरळ बाई होती, तिच्या संसाराच्या गणगोतात दोन लोक होते—एक दारू पिणारा नवरा आणि एक तसाच व्यसनाधीन मुलगा. दारूने त्यांचा संसार विघटित केला होता. घरात रोजची भांडणे, शिव्यांचा मारा, आणि हाताच्या फटक्यांची साक्ष होत होती. ह्या सगळ्याला कंटाळून ती माऊली शेवटी हार मानली, आणि विषारी औषध घेतलं.

गावातल्या लोकांनी तिच्या नवऱ्याला दोष दिला, काहींनी मुलाला. पण कोणालाही दारूला दोष देण्याचा विचारही मनात आला नाही. 'दारू मुळे हे घडले' हे कुणाच्याही लक्षात आलं नाही. गावातल्या विचारवंतांनी आपले विचार मांडले, पण त्यांच्या चर्चेतून दारूचा उल्लेख कधीच झाला नाही. कुणीही गावातून दारू किंवा इतर नशेचे पदार्थ बंद करायला पाहिजेत असं बोललं नाही. सगळ्यांच्या चर्चा फक्त माऊलीच्या कुटुंबावर केंद्रित होत्या.

मी मात्र ठाम होतो—ही आत्महत्या नव्हती, तर ही एक हत्या होती. हत्यारे कोण होते? ते दारू विक्रेते होते, ज्यांनी त्या माऊलीच्या घराचा नाश केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, हेच हत्यारे माऊलीच्या देहाला जाळण्यासाठी अग्रेसर होते. ज्यांनी तिचं जीवन संपवलं, त्यांनीच तिच्या अंतिम संस्काराची जबाबदारी घेतली.

त्या गावातील लोकांनी ह्या घटनेतून काय शिकायचं हेच महत्वाचं होतं. माऊलीची आत्महत्या नव्हती, तर ती दारू विक्रेत्यांच्या हातून झालेली हत्या होती. जेव्हा समाजाने याची जाणीव ठेवली, तेव्हाच अशा माऊलींची वाचवणूक होईल. अन्यथा, असं दुःखाचं चक्र अखंडपणे सुरूच राहील.


- मं.बा.काकडे  : विद्रोही समाज (३० /०८/२०२४)

No comments:

Post a Comment